नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी असून अत्यवस्थ, अपघात आणि इतर आजारांचे रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर औषधांचा तुटवडा नसावा अशी प्राथमिक माहिती आहे, मात्र या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागवला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार..
नांदेड रुग्णालयात रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून त्या बाबतीत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी ऍडमिट झाले होते? ही सर्व माहिती मागविण्यात आली असून नांदेडसह संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे भारती पवार यांनी म्हटले आहे.
अनेकदा असं होत की रोड ट्राफिक एक्सीडेंट असतात, इमर्जन्सी असते आणि पेशंट शिफ्ट करता करता पण त्या दुर्दैवी घटना घडतात. त्याचबरोबर काही पेशंट ऍडमिट असतात, काही ऑपरेशनसाठी असतात,ऑपरेशनच्या नंतरच्या काही कारणांमुळे घटना घडत असतात. अजून त्या बाबतीत खुलासा झालेला नाही. अनेकदा इमर्जन्सी पेंशट असतात, यात स्नेक बाईट किंवा ऍक्सीडेन्ट असतात यात पेशंटला दुर्दैवाने मृत्यू येतो. त्यामुळे याबाबतीत सविस्तर खुलासा मागवलेला आहे आणि सर्व प्रकारे केंद्र सरकार राज्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी तत्पर आहे, बजेट देखील त्यासाठी दिला जातो. याबाबतीत माहिती घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.