नांदेड : ‘डॉक्टर नव्हते, मशीन बंद होत्या; बाळाचा मृत्यू झाल्यावर आमच्या सह्या घेतल्या'
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (21:54 IST)
“खासगी दवाखान्यात आमचं लेकरू जन्माला आलं. पण त्याची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी बाळाला काचेत ठेवावं लागेल असं सांगितलं. त्यासाठी दीड लाख खर्च होता. आमची तेवढी परिस्थिती नव्हती. म्हणून शासकीय रुग्णालयात त्याला घेऊन आलो.
तिथं आल्यावर त्यांनी मुलाला भरती करून घेतलं आणि काही औषधं आणायला सांगितली. ती आम्ही आणली. पण रात्री आमचं लेकरू वारल्याचं सांगण्यात आलं. त्याआधी तिथे 4 लेकरांचा मृत्यू झाला होता. तिथल्या मशीन्स बंद पडल्या होत्या. डॉक्टरांचं लक्ष नव्हतं”
आपल्या पुतण्याविषयी सांगताना योगेश साळोंके यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या48 तासांत (1 ऑक्टोबरपासून) 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 12 नवजात मुलांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक मुलगा हा योगेश साळोंके यांचा पुतण्या होता.
जग बघण्याआधीच आपलं लेकरू सोडून गेलं याचं दु:ख साळोंके यांच्या विदीर्ण चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.
योगेश साळोंके यांच्या भावजयीचं खासगी रुग्णालयात सीझर करण्यात आलं होतं. तिथं त्यांचा मोठा खर्च झाला होता.
पैशांची अडचण निर्माण झाल्यावर त्यांनी नवजात बालकाला शासकीय रुग्णालयात भरती केलं होतं.
“आम्हाला आत काय व्यवस्था आहे हे पाहू दिलं नाही. तिथे मशीन्स बंद होत्या. ऑक्सिजनची सोय नव्हती. त्यांनी रुग्णालयात सोय नाही असं सांगितलं असतं तर आम्ही बाळाला दुसरीकडे घेऊन गेलो असतो," असं साळोंके सांगतात.
तसंच नवजात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर काही पेपरवर सह्या घेतल्याच्या आरोप साळोंके यांनी केला आहे.
"रात्री बाळाचं डायपर बदलण्यासाठी ते आमच्याकडे दिलं तेव्हा ते व्यवस्थित वाटत होतं. ते आवाज करत होतं. थोडं रडलंही. त्याला पुन्हा ICU मध्ये नेण्यात आलं. त्याच्या अर्ध्यातासानं आमच्याकडून काही सह्या घेतल्या. त्यानंतर काही वेळाने लगेच आमचं बाळ गेल्याचं सांगितलं," असं साळोंके सांगतात.
नांदेडचं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय तृतीय स्तरावरील रुग्णालय आहे. त्याठिकाणी जवळपास 70-80 किमी परीघातील रुग्ण येत असतात.
इतकं मोठं रुग्णालय या भागात कुठंही नसल्याने अत्यावस्थेतील रुग्ण इथे येतात. मृत्यू झालेले सर्व रुग्ण अत्यावस्थेत आले होते, असा रुग्णालयाचा दावा आहे.
याशिवाय या रुग्णालयातील स्टाफच्या बदल्या झाल्याने काही प्रमाणात अडचण निर्माण झालीय, असंही रुग्णालयाचे अधिष्ठाता वाकोडे यांनी सांगितलं.
मधल्या काळात हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी झाली नाही. त्यामुळे काही प्रमाणात औषधांचा तुटवडा आहे. त्यासोबत रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढल्याने बजेट कमी पडत आहे, असं रुग्णालयाने सांगितलं.
"गेल्या एक-दोन दिवसांत रुग्णांची संख्या अचानक वाढली. त्यामध्ये प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची जास्त संख्या होती. 12 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 8 बालक हे बाहेर उपचार घेऊन आले होते. या मुलांचं वजन कमी होतं. काही वेळेआधीच जन्माला आली होती," असं वैद्यकीय अधिकारी गणेश मनूरकर यांनी सांगितलं.
रुग्णालयाकडून स्पष्टीकरण
दरम्यान, या घटनेवर नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
रुग्णालयाच्या पत्रकानुसार, '30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांश रुग्ण हे अत्यंत गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते.'
'रुग्णालयात अत्यावश्यक औषधांसाठीचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आणखी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून आणि बाहेरून जास्त प्रमाणात आले आहेत. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे असं रुग्णालयाचं म्हणणं आहे.'
'या संपूर्ण परिस्थितीवर डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेवून आहेत आणि दाखल झालेल्या रुग्णांवर औषधोपचार केले जात आहेत,' असंही रुग्णालयाने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
या घटनेची चौकशी करू - मुख्यमंत्री
मंगळवारी (3 ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं.
"सरकारने नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना गांभिर्याने घेतलीय. प्राथमिक माहितीनुसार मृतकांमध्ये बालकं, वृद्ध, हृदयविकार आणि अपघातात जखमी झालेले लोक यांचा समावेश आहे. पण या एकूण प्रकरणाची चौकशी केली जाईल," असं शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
तसंच पुरेसा स्टाफही असल्याचा त्यांनी दावा केला. औषध आणि हॉस्पिटल चालवण्यासाठी 12 कोटी आधीच मंजूर केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
पण याआधी सोमवारी (2 ऑक्टोबर) काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात नर्स स्टाफची बदल्याने जागा रिकाम्या आहेत.
डॉक्टर्सची कमतरता आहे. रुग्णालयातील अनेक मशीन्स बंद आहेत. पुरेसं बजेट मिळालं नाही. रुग्णालयाची क्षमता 500 रुग्णांची आहे. तरी तिथे 1200 रुग्णांची भरती करण्यात आली आहे.
दीड महिन्यांपूर्वी ठाण्यात एका रात्रीत 18 मृत्यूचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर नांदेडमध्ये ही घटना घडली आहे.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर वेळेवर येत नसून रुग्णांना औषधं दिली जात नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.