कुणालाही विश्वासात न घेता आलं यांच्या मनात, केलं जाहीर. असं नसतं-अजित पवार

शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (21:03 IST)
गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सरकारला सोशल मीडियात ट्रोल केलं. नोकरी मिळण्यासाठी आम्ही आयुष्यभर केवळ अभ्यासच करायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या निर्णयावरुन सरकारच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायाचा नसतो, अशा शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं. अजित पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला ते भेट देणार आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
कायमचं अपंगत्व आलं तर ५ लाख रुपये मदत समजू शकतो. पण, त्या व्यक्तीचं रेकॉर्ड, शिक्षण याची कोणतीही माहिती नाही. क्रीडा विभागालाही विश्वासात घेतलं नाही. एकदम ५ टक्के आरक्षणाची तुम्ही घोषणा करता. कुणालाही विश्वासात न घेता आलं यांच्या मनात, केलं जाहीर. असं नसतं, असे म्हणत अजित पवार यांनी गोविंदा निर्णयावरुन सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला. १३ कोटी जनतेला साधारण काय वाटतं, याचाही विचार करायचा असतो, असंही पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती