नागपुरात व्यावसायिकाने पत्नी आणि मुलासह कार पेटवून स्वतःला पेटवले

बुधवार, 20 जुलै 2022 (14:51 IST)
महाराष्ट्रातील नागपुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पत्नी आणि मुलासह एका व्यक्तीने कारमध्ये स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा थोडक्यात बचावले. सदर व्यक्ती आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने हे भयानक पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 
 
 बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात दुपारी ही घटना घडली. रामराज गोपालकृष्ण भट (63 रा. जयताळा) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी संगीता भट (55) आणि मुलगा नंदन (30) गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
रामराज यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. ते विविध कंपन्यांना नट-बोल्टचा पुरवठा करत होते. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने त्यांना प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट यांना आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. त्यांचा मुलगा नंदन हा इंजिनिअर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होते, मात्र मुलगा नंदन कामाला जायला तयार नव्हता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते आणि त्यामुळेच भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 
 
पोलिसांना रामराज भट यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट पाकिटात ठेवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पाकिट प्लास्टिक पिशवीत गुंडाळून कारपासून काही अंतरावर फेकून दिली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस देखील आगीचे कारण काय आहे याबाबत संभ्रमात पडले होते. काही अंतरावर पाकिट सापडल्याने आत्महत्येचे कारण समोर आले. सुसाईड नोट कन्नड आणि इंग्रजीमध्ये लिहिली होती. प्रचंड आर्थिक विवंचनेमुळे आपण हे पाऊल उचलत असून यासाठी कुणीही जबाबदार नसल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते
 
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक कोंडी असल्यामुळे त्यांनी सहकुटुंब आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, रामराज भट यांनी त्यांची पत्नी आणि मुलाला हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्या दोघांना रामराज यांचा हेतू माहित नव्हता.त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगितले. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेले द्रवपदार्थ तिघांवरही फवारले आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले; सुदैवाने पत्नी आणि मुलगा त्यात बचावले मात्र रामराज यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती