पोलिसांना शिवीगाळ केल्या प्रकरणी आमदारांना अटक

सोमवार, 3 जानेवारी 2022 (16:25 IST)
पोलिसांना शिवीगाळ करणे भंडाऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारमोरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शिवीगाळ केली. राजू कारमोरे यांनी 31 डिसेंबर रोजी रात्री मोहाडीच्या पोलीस ठाण्यात जाऊन चांगलाच धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ केल्यानं त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. 
कारमोरे यांचे दोन व्यापारी मित्र 31 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता तुमसर कडे जात असताना मोहाडीला बंदिस्तीसाठी लावलेल्या पोलिसांनी त्यांची कार अडविली. गाडी वळत असताना इंडिकेटर का दिले नाही. त्यावेळी त्यांच्या कडे 50 लाख रुपये देखील होते. जे त्यांनी आमदारांच्या घरातून आणले होते. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांचा पाठलाग केला. त्यावर त्यांच्या मित्रांनी पोलिसांनी आम्हाला मारहाण करून  सर्व पैसे आणि गळ्यातली सोन्याची साखळी हिसकावून घेतली. अशी तक्रार मोहाडी पोलीस  ठाण्यात दिली. तर बंदिस्तावर तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि त्यांनी शासकीय कामात अडथळा आणण्याचे सांगितले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. 
हा सर्व प्रकार कारमोरे यांना कळल्यावर त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन मित्रांच्या सांगण्यावरून धिंगाणा घातला आणि पोलिसांना शिवीगाळ केली.या शिवीगाळ करण्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. 
नंतर त्यांनी जाहीररित्या माफी मागितली. पोलिसांनी आमदार कारमोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती