खा. शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीवर निशाणा

सोमवार, 3 जानेवारी 2022 (15:19 IST)
पुणे - महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील कुरबुरी हा नवा विषय नाही. पण, या महाविकास आघाडीतील शिवसेनेला मात्र आता आपल्या अस्तित्वासाठी पदर पसरून गयावया करावी लागते आहे. 'पुण्यातील शिवसेनेला संपवू नका, आम्हाला जगू द्या' असे पुण्यातील शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही शरसंधान केले आहे.
 
''दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंधन बांधले आणि या दोन पक्षांसह सत्तेचा उपभोग घेण्यासाठी राज्यात सरकार आणले. मात्र, तेव्हापासून या तीन पक्षांत कुरबुरी असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. 'महाविकास आघाडी आम्ही मान्य केली आहे, आम्ही आघाडीची तत्त्वे पाळत आहोत. पण शिवसेना संपविण्याचा डाव पुण्यात खेळला जात आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या, एवढीच आमची मागणी आहे'', असे मत शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, ''गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमचे अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारू नका. आम्ही कुणाच्याही नादी लागत नाही. वरिष्ठांच्या कानावर आम्ही वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत.'' लांडेवाडी येथे होणाऱ्या बैलगाडी शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण, आम्ही ही बैलगाडा शर्यत आयोजित केली. म्हणून अनेकांच्या डोळ्यात ती सलू लागली. हे कारस्थान विरोधक आणि प्रशासनाने केले.' खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादंग सुरू झाले आहेत. खेडच्या राष्ट्रवादी आमदाराबाबत आढळराव पाटील यांनी आधीही आरोप केले होते. त्यामुळे आता आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती