इम्तियाज जलील यांनी राजीनामा देऊन खुशाल राष्ट्रवादीत यावं!

शनिवार, 19 मार्च 2022 (21:34 IST)
‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज ललील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावे. शरद पवार (Sharad Pawar) साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
 
पालकमंत्री छगन भुजबळ हे निफाड तालुक्यातील विंचूर येथे बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल ‘एमआयएम’चे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यांनतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे आवाहन खासदार जलील यांनी केले.
 
इम्तियाज जलील हे पुढे म्हणाले कि, ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. म्हणजेच एमआयएम महाविकास आघाडीशी युती करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. तर ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य आज राजेश टोपे यांनी केले आहे.
 
दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासदार जलील यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यात या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ‘एमआयएम’बाबत ‘राष्ट्रवादी’चा सॉफ्ट कॉर्नर असल्याचेही बोलले जात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती