जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:45 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीत आहे.‘निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे.आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे.यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,’ असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे.८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली यादी मंजूर केलेली नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.त्या भेटीत १२ सदस्यांच्या यादीवर चर्चा झाली.महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीतील काही नावांवर राज्यपालांना आक्षेप असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
राज्यपालांचा निर्णय होऊ द्या, मग काय करायचे ते ठरवू,अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या दोन जागा राष्ट्रवादीने देण्याचे मान्य केले होते. पण, बुलढाण्याची जागा देण्यात अडचण आल्याने त्याबदल्यात विधान परिषदेची एक जागा देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेट्टी यांना दिला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती