युवानांही सतावतोय निद्रानाश

शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (21:28 IST)
तरुणांमध्ये आढळणार्या निद्रानाशाचे बरेच प्रकार आहेत. काही वेळा आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे निद्रानाश होतो. ही समस्या थोड्या काळासाठी उद्‌भवते. कामातला बदल, परीक्षेचा ताण, आयुष्यातली दुःखद घटना किंवा सततचा प्रवास यामुळेही निद्रानाश होतो. हा त्रास औषधोपचारांशिवायही बरा होतो. 
 
काही वेळा रात्री झोपेत अडथळे येतात. गाढ झोपल्यानंतर रात्री अचानक जाग येते. त्यानंतर पुन्हाझोप येत नाही. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅझप्नियामध्ये झोपेत अचानक श्वास थांबतो. टॉन्सिल्सचा आकार वाढल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच स्थूलपणाही या त्रासाला कारणीभूत ठरतो. ही समस्या असणारे लोक घोरतात. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि झोपेत घामही येतो. 
 
निद्रानाशाची समस्या एका महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत टिकून राहिल्यास त्याला क्रोनिक इन्सोमनिया म्हटलं जातं. मानसिक आरोग्यविषयक तक्रारी, औषधांचे दुष्परिणाम अशा कारणांमुळे हा त्रास होतो. अशा परिस्थितीत उपचारांची गरज लागते. नैराश्य, भीती, पाठीचं दुखणं यामुळे निद्रानाश झाला असेल तर त्याला कॉमॉरबिड इन्सोमनिया म्हटलं जातं.
 
इतर काही कारणांमुळेही निद्रानाश होतो. विशिष्ट प्रकारचे अन्नघटक निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. टायरामाईनमुळे झोप येत नाही. चीझ, चॉकलेट, बटाटे, वांगी, साखर, सॉस यात टायरामाईन असतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाऊ नयेत. रात्रीच्या वेळी तळलेले, मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. पचायला जड पदार्थांमुळे झोप येत नाही. 
 
झोपण्याआधी चहा-कॉफी पिऊ नये. कॅफेनमुळे मेंदू ताजातवाना झाल्याने झोपेवर परिणाम होतो.त्यामुळे चहा-कॉफीसारखी पेयं झोपायच्या किमान चार तास आधी घ्यावीत.
मंजिरी  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती