येरवडा भुखंड प्रकरणाचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. मीरा बोरवणकरांनी जे काय आरोप केले आहेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. असा सांगताना माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून माझी कोणत्याही कागदपत्रावर सही नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच एखादे पुस्तक प्रकाशित झाल्यावर प्रसिध्दीसाठी करण्यात येणाऱ्या युक्त्यांसारखा हा प्रकार वाटतो असाही टोला अजित पवार यांनी मीरा बोरवणकरांना लगावला आहे. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर गंभिर आरोप केले होते. मीरा बोरवणकरांच्या या आरोपांचे खंडन करण्यासाठी अजित पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “संबंधित प्रकरणी मी त्यावेळच्या अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे खर आहे पण तो निर्णय घ्यायला मी कोणताही दबाव टाकला नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यावर मीही त्यावर पुन्हा चर्चा केली नाही.” असे अजित पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ज्या त्या विभागाचे लोक पालकमंत्र्यांना आपल्या अडचणी सांगत असतात, त्यावेळी त्या गोष्टीचा आढावा घ्यावा लागतो. तत्कालिन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, मी येरवाडा भूखंडाविषयी मीरा बोरवणकर यांना विचारल्यावर त्यांनी भूखंड बिल्डरला देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर मी त्या भुखंडाशी संबंधित प्रकरणावरून कधीही त्यांना विचारले नाही.” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.