महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही : राज ठाकरे

बुधवार, 15 डिसेंबर 2021 (07:56 IST)
राज्यातील ठाकरे सरकार लवकरच पडेल असे दावे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. त्यासाठी वारंवार तारखा दिल्या जातात. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं राज म्हणाले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुका आल्यानं राज ठाकरे बाहेर पडल्याची टीका विरोधक करतात. त्या टीकेला राज यांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणुका येतच राहतात. त्यामुळे निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पण त्याचीही खात्री देता येत नाही. त्याही निवडणुका सहा आठ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
 
सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं प्रकरण सुरू आहे. केंद्रानं मोजायचं की राज्यानं मोजायचं यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. कोणी सामोरं जायला तयार नाही. आमच्याकडे मतं मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसींना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असं राज यांनी म्हटलं.
 
सध्या तरी लोक मला फुकट घालवत आहेत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही, निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनताही मतपेटीतून राग व्यक्त करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले. मनसेने अनेक वर्षे टिकेल असा विकास केला. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, असं ते म्हणाले.
 
रणनिती सांगण्यास स्पष्ट नकार
यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना आगामी निवडणुकीसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, असा प्रश्न विचारला. त्यावर राज म्हणाले, स्ट्रॅटेजी ही हिडनच असते, उघड केली जात नाही. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचे काम झालेले नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, आज जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती