'शिवसेनेचा गद्दार मी नाही, अनिल परब आहे' : रामदास कदम

शनिवार, 18 डिसेंबर 2021 (13:26 IST)
मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केलीय, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
 
रामदास कदम म्हणाले, "अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. गेली दोन वर्षे ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात. बाकी संबंध जिल्हा वाऱ्यावर सोडलंय. जिल्ह्यात येत नाही, जिल्ह्यात पालक म्हणून कुठलं काम नाही."
 
रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
 
मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. हे मला राजकीयदृष्ट्या आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा कट आहे.
तथाकथित ऑडिओ क्लिप आली होती. त्यात मी पक्षाच्या बाबतीत काहीही बोललो नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन, किरीट सोमय्यांना कुठलेही कागदपत्र दिले नाही. पक्षाला हानी होईल असं काहीही केलं नाहीय.
दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काही पथ्य पाळले होते.
अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. गेली दोन वर्षे ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात. बाकी संबंध जिल्हा वाऱ्यावर सोडलंय. जिल्ह्यात येत नाही, जिल्ह्यात पालक म्हणून कुठलं काम नाही.
अनिल परब यांच्याविरोधात बोलणं म्हणजे पक्षावर बोलणं नव्हे.
यांनी हॉटेल बांधायचं, मग त्यावर कारवाई झाल्यावर शिवसेनेच्या नेत्याला बोलणं.
मी शिवसेनाप्रमुखांचा मावळा आहे,.
रामदास कदमना राजकारणातून संपवायचं, असा डाव शिवसेनेतल्या नेत्यांचाच आहे.
अनिल परबांना आव्हान आहे की, वांद्रेमधून विधानसभेला उभं राहून निवडून येऊन दाखवा. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असाल, पण त्याचा अर्थ असा नाही की, शिवसेनेच्या नेत्याला उद्ध्वस्त करायचं.
माझ्या मुलाला योगेश कदमला तिकीट देऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर घेऊन गेले होते.
योगेश कदमला तिकीट दिल्यानं अनिल परब यांनी राग काढला. योगेश कदमविरोधात सूडाची भावना ठेवली.
मनसेचे नेते वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना अनिल परब यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक आमदारांना डावलण्याचं काम अनिल परब यांनी केलं.
मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केलीय.
ज्यांनी इथं राष्ट्रवादीला गाडलं त्यांनाच बाजूला केलं जातंय
शिवसेना म्हणजे काय हे उदय सामंत शिकवतोय. पक्षासाठी आम्ही 52 वर्षे घालवली.
उद्धव साहेबांना आठवण करून देतो की, पक्षाची वाईट वेळ होती तेव्हा समोरच्या सीटवर मी बसलेलो असायचो.
शिवसेना पक्षप्रमुक उद्धव साहेब आहेत की अनिल परब आहेत हा आम्हाला प्रश्न पडलाय.
रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपद नको, आमचं वय झालं, नवीन लोकांना मंत्रिपदं दिली. पण मंत्रिपदं दिली त्यात पहिलं नाव सुभाष देसाई होतं. मला वाईट वाटलं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला मान्य. पण मनातल्या वेदना सांगतोय.
मला कुठलेही पद नको. 32 वर्षे आमदार होते. विरोधी पक्षनेताही झालो.
अनिल परब म्हणतात निधी देणार नाही. तुझ्या बापाचा पैसा आहे का? जिल्हा नियोजनाचा पैसा आहे.
उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. कोरोना काळात ते भेटत नव्हते. आता ते बरे झाले आहेत. ते लक्ष देतील, असा विश्वास आहे. शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही, असा विश्वास आहे.
राष्ट्रवादीचे तटकरे शिवसेनेला कसे संपवतायेत, याचं पत्र उद्धव ठाकरेंना पाठवलंय. कुणबी भवनाला पाच कोटी देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत या, अशी अट तटकरेंनी घातलं. कोकणातला कुणबी समाज शासनाचा पैसा देऊन फोडला जातोय.
अनिल परबच्या बापाचा मतदारसंघ आहे का? तू पैसे दिलेस का? शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालाय.
पुढचा निर्णय कुटुंब, पदाधिकारी सर्व बसून घेऊ. अन्याय किती सहन करायचं याची मर्यादा आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, उदय सामंत यांना कुणालाही फोन केल्यास सांगितलं जातं की, अनिल परबला सांगतो म्हणतात.
अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय, हवा गेलीय.
मी शिवसेनेतून कदापि बाहेर पडणार नाही. पण माझी मुलं निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. माझ्या मुलाच्या भवितव्यावर घाव घातला जातोय.
मला पक्षातला काढलं, हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक म्हणूनच जगेन.
किरीट सोमय्याशी कधीही बोललो नाही. त्याला कुठलेच कागदपत्र पुरवले नाहीत. त्याला कधी पाहिलं नाही. पाहण्याची इच्छाही नाही.
पक्षाच्या विरोधात काहीही बोललो नाही. अनिल परब म्हणजे पक्ष असेल तर मग काय इलाज नाही. रामदास कदम याची पक्षासाठी काहीच योगदान नाही, असंच असेल तर मग काय बोलायला नको.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची पक्षांअंतर्गत कोंडीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच रामदास कदम आज (18 डिसेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. रामदास कदम नक्की काय बोलणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
 
नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले रामदास कदम गेल्या दोन वर्षांपासून फारसे समोर आले नाहीत. मात्र, काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजप खासदार किरीट सोमय्यांना माहिती पुरवल्याचा आरोप मनसेचे रत्नागिरीतील नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.
 
त्यानंतर रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नामक व्यक्तींमधील संवादाच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा केला होता.
 
त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यताही मावळली. कारण रामदास कदम यांच्याऐवजी वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आणि ते बिनविरोध जिंकलेही.
 
अनिल परब यांच्यासंदर्भातील संवादाच्या ऑडियो क्लिप्स व्हायरल झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही कदमांवर नाराज असल्याचं बोललं गेलं. त्यातूनच कदमांना उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा आहेत.
 
हे एकीकडे सुरू असतानाच, आता रत्नागिरीतल्या पदाधिकारी नियुक्त्यांमधूनही रामदास कदम यांना धक्का दिल्याची चर्चा कोकणात सुरू झाली आहे.
 
रत्नागिरीत शिवसेनेनं पक्षाचे जे नवे पदाधिकारी नियुक्त केलेत, त्यात रामदास कदम यांच्या समर्थकांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
या सर्व पार्श्वभूमीवर रामदास कदम आजच्या पत्रकार परिषदेतून काही बोलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती