मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार शुभांगी पाटील

शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (20:44 IST)
नाशिक:नाशिक पदवीधरचे निकाल जाहीर झाले असून यात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विरोधक मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून यावर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही, पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहे अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे.
 
बहुचर्चित ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल लागले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. या निवडणुकीत सत्यजित सुधीर तांबे यांना 68999 मते मिळाली असून शुभांगी भास्कर पाटील यांना 393934 मते मिळाली आहेत. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय आहे.
 
यावर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या, “40 हजार मते पडणं एक सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. असा विश्वास शुभांगी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
 
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “यात जुन्या पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार.”
 
Edited By-Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती