यंदा गणेशोत्सव कसा साजरा होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

गुरूवार, 21 जुलै 2022 (17:36 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव आणि दहीहंडी कशी साजरी होणार याबद्दलची महिती आज पत्रकार परिषदेत दिली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कायदा सुव्यवस्था राखून शांततेत उत्सव झाले पाहिजे याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि दहीहंडी पार पडल्या पाहिजे यासाठी आगमन आणि विसर्जनाच्या मार्गावरचे खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंडप आणि इतर सोयींसाठी यासाठी एक खिडकी योजना चालू केली आहे."
 
"मंडळांना कुठल्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावं लागू नये यासाठी सूचना दिल्या आहेत. हमीपत्र घेण्याची आवश्यकता नाही हेही सांगितलं आहे. उत्सव साजरा करताना नियमांचा बागुलबुवा करू नये." असंही ते म्हणाले.
 
"कोव्हिडमुळे मुर्त्यांच्या उंचीवरची मर्यादा होती. ती काढून टाकली आहे. जल्लोषात साजरा होईल अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे. जे विसर्जन घाट आहे, तिथे लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुर्तिकारांची मागणी होती की जागा उपलब्ध व्हाव्यात. अशा जागा ओळखून शासन सहकार्य देईल." असं शिंदे म्हणाले.
 
धर्मादाय आयुक्तांच्या बाबतीत सुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दहीहंडी उत्सव साजरा करताना नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन वर्षांपासून संकट होतं. उत्साह जोरात आहे. आम्ही चांगले निर्णय घेऊन आनंद साजरा करता यावा याची सोय केली आहे.
 
मुंबई गोवा रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. त्यांना टोलमाफी देणार आहे. कोकणात जादा प्रमाणात एसटी सोडाव्यात असं सांगितल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती