नाशिक : नंदिनी नदीपात्रात पोहतांना पाण्यात बुडून बारा वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू,आतापर्यत अकरा नागरिकांचा मृत्यू

मंगळवार, 19 जुलै 2022 (15:25 IST)
शहरातील तिडके कॉलनीजवळ नंदिनी काठालगत वसलेल्या मिलिंद नगर परिसरातील एक शाळकरी मुलाचा नंदिनी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग दहा दिवस पावसाने धुमाकूळ घातला.त्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असून अधून मधून हलक्या सारी कोसळत आहेत.
दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने ठिकठिकाणी दहा व्यक्ती वाहून गेल्या त्यापैकी सात जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे.
तिडके कॉलनी जवळ नंदिनी नदीकाठालगत वसलेल्या मिलिंदनगर परिसरातील एका शाळकरी मुलाचा नंदिनी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सागर लल्लन चौधरी (१२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.आई-वडील रोजंदारीने कामावर गेलेले असताना रविवारी शाळेला सुटी असल्याने सागर हा काही मित्रांसोबत राहत्या घरापासून पुढे काही अंतरावर नदीकाठावर गेला. त्यावेळी सागर हा नदीपात्रात पाण्यात खेळण्याचा आनंद घेताना अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात तो वाहू लागला आणि भोवऱ्यात सापडला.
 
ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली आणि मदत मागितली. दरम्यान, दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयाला ही माहिती मिळाली. त्वरित अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी नदीपात्रात उड्या घेत तिडके कॉलनी-बाजीरावनगरदरम्यान नदीपात्रातून सागरला बाहेर काढले होते.
 
त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. सागर हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई, वडील हे रोजंदारीने मोलमजुरी करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने मिलिंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
आतापर्यत अकरा नागरिकांचा मृत्यू:
जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे गेल्या 09 जुलै ते 16 जुलै पर्यंत एकूण अकरा व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर 3, पेठ 1, सुरगाणा 3, दिंडोरी 01, नाशिक 02, मालेगाव 01 अशा व्यक्ती वाहून गेल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत आठ व्यक्तींचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित बेपत्ता असल्याचा शोध सध्या घेतला जात आहे. नाशिक शहरात सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बचत पथक अधिक कामाला लागले असून उर्वरित व्यक्तींचा देखील लवकर शोध लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती