मोदी सरकारने महाराष्ट्राला कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली ?

शनिवार, 3 एप्रिल 2021 (21:36 IST)
केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला  कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ‘मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारी  चक्रिवादळ, अतिवृष्टी, विदर्भातील पूरस्थिती अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही मविआ सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपचे नेते मात्र मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले.
 
राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते यांनी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले ? मोदींनी जाहीर केलेल्या त्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले ? या 20 लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे. कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी मारली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती