मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बिल चार महिन्यात 2 कोटी 38 लाख कसं? अजित पवारांचा सवाल

रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (17:33 IST)
एकनाथ शिंदे सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बिल चार महिन्यात 2 कोटी 38 लाख कसं, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्य सरकारवरील आरोपांचा पाढा वाचला.
 
ते म्हणाले, "अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी माझी चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात किती योजना सांगितल्या गेल्या. त्या योजनांची सद्यस्थिती काय आहे, त्या कधी पूर्ण होतील, याविषयी आम्ही चर्चा केली. स्थगितीमुळे जी कामे अडून राहिली आहेत, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील, या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला."
 
पवार यांनी पुढे म्हटलं, "आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि युवक यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय कसं मिळवून देता येईल, याबाबत चर्चा झाली. आम्ही सरकारमध्ये असताना देऊ केलेली मदत अद्याप पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत."
 
यावेळी पवार यांनी सोलापुरात 2 किलोचा धनादेश मिळालेले शेतकरी राजेंद्र चव्हाण यांचा उल्लेख केला.
 
"आम्हाला एका शेतकऱ्याने संपर्क साधला. सोलापुरातील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 17 फेब्रुवारी रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये 512 किलो कांदा विकला. त्यांना किलोला एक किलोप्रमाणे भाव मिळाला. त्यामधील सर्व खर्च वगळून त्यांना केवळ 2 रुपयांचा धनादेश मिळाला आहे. असं होणार असेल तर शेतकऱ्याने काय करावं," असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.
 
"कांदा निर्यात करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. शेजारील बांग्लादेशात कांद्याची प्रचंड मागणी आहे.
 
आपल्या देशात मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कांदा परदेशात जायला हवा. कांदा ग्राहकाला परवडला पाहिजे. पण शेतकऱ्याचा खर्चही निघायला हवा, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.
 
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनल्याचं सांगत पवार यांनी म्हटलं, "नागपूर अधिवेशन संपल्यानंतर विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची गुंडगिरीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे."
"शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा भ्याड प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. संजय राऊतांनाही ठार मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला असता कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे.
 
कसबा-चिंचवडसारख्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री चार दिवस पुण्यात ठाण मांडून बसले होते. त्यांनी संपूर्ण राज्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. त्याशिवाय, निवडणूक आयोगाचा शिवसेनेसंदर्भातील निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप पवार यांनी केला.
 
"त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्या बाजूला गेले म्हणून पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं. मग एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील आणि ते निघून गेले, तर काय करणार," असा प्रश्नही पवार यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले, “मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचा फक्त एक आमदार आहे. त्यांनी उद्या म्हटलं की पक्षही माझा, इंजीनही माझं, तर तुम्ही तसाच निर्णय देणार आहात का, हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे.”
 
"एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्याविरोधात जनभावना तीव्र झाली आहे. विशेषतः निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर त्यांच्याविषयी जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. गेल्या 8 महिन्यांत उद्योग बाहेर गेले. ते राज्यात आणण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही," असा आरोप पवार यांनी केला आहे.
 
"सत्ताधारी पक्षाचे आमदारच शिवीगाळ, मारहाण करत आहेत. विकासकामामुळे राजकारण होत असल्याने विकासाला खीळ बसली आहे. जिल्हा वार्षिक योजनेचा निधीही खर्च करण्यात आला नाही. सरकारचं राज्याकडे लक्ष नाही," असे आरोप अजित पवार यांनी राज्य सरकारवर केले.
 
Published by- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती