पुणे/ सातारा जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठय़ात वाढ होत असून, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात सहा फुटाने वाढ झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी संध्याकाळी 14 फुटांवर गेली. अलमट्टी धरणामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने सांयकाळी 75 हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. जिह्यातील शिराळा आणि वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यांत पावसाचा जोर वाढला आहे. उर्वरित भागातही पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे.
कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. चांदोली धरण क्षेत्रात 24 तासांत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठय़ात वाढ सुरूच असून, सध्या 18.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत 177 मिलिमीटर पाऊस झाला. दिवसभरातही पावसाचा जोर सुरू असून, 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात 34 हजार 407 क्युसेक्सने आवक सुरू आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा 32.50 टीएमसी झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वर या पावसाच्या आगारामध्ये अतिवृष्टी सुरूच आहे. तेथे चोवीस तासांत अनुक्रमे 191 आणि 102 मिलिमीटर पाऊस झाला. अलमट्टी धरणात 81 हजार 910 क्युसेकने आवक होत आहे. धरणाच्या पाणीसाठय़ाची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या 83.85 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सायंकाळपासून 75 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.