शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (21:16 IST)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी  बुधवारी (20 डिसेंबर) रोजी संपली आहे.  दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दरम्यान आता वेध लागले आहेत ते निकालाचे. तेव्हा 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून, तेव्हा अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.
 
शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या शिवसेनेत दोन गट असून, शिंदेची शिवसेना सत्तेत आहे. अशातच ठाकरे गटाने दाखल केलेली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आधी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान ही वेळ वाढवून देण्यात यावी

अशी मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याला मुदतवाढ देऊन 10 जानेवारी 2024 पर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले आहे. याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर मागील तीन महिन्यापासून सुरू असलेली शिवसेना अपात्रता प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून, आता दोन्ही गटातील आमदारांचे निकालाकडे लक्षं लागले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी पूर्ण झाली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.
 
या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून अनेक दावे-प्रतीदावे, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हजारांच्या जवळपास प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही बाजूंनी विचारण्यात आले आणि त्यामुळेच या संपूर्ण तीन महिन्यातील सुनावणीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती