प्रत्येक आमदाराला केवळ दोन पासेस

गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (09:20 IST)
नागपूर : संसदेत घडलेल्या या घटनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पास दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
 
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (१३ डिसेंबर) १० वा दिवस आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. दरम्यान, अनेक खासदारांनी या दोन इसमांना घेरले. त्याचवेळी या दोघांनी त्यांच्या बुटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असे म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजिटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका.
विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हाच मुद्दा मांडला. तसेच पवार म्हणाले, ‘‘माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधिमंडळाचे पासेस कमी करायला हवेत.’’ अजित पवार यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पास दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही
 
उपसभापतींनीही विधान परिषदेतील ‘गॅलरी पास’ केले बंद
आज लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्यांपैकी दोन तरुणांनी खासदार बसलेल्या सभागृहात उडी मारली. त्यामुळे तिथे उपस्थित खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळात असे काही होऊ नये म्हणून उपसभापती नीलम गो-हे यांनी नवीन लोकांसाठी गॅलरी पास बंद केले आहेत. उपसभापती नीलम गो-हे म्हणाल्या की, आपण नवीन गॅलरी पासेस बंद करत आहोत. कारण दिल्लीत लोकसभा अधिवेशनात गॅलरीतून दोन नागरिकांनी उडी मारल्यामुळे त्याठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण नवीन लोकांसाठी गॅलरी पासेस बंद करत आहोत. त्यामुळे कोणत्याही आमदारांनी गॅलरी पासेसचा आग्रह करू नये. तसेच लोकसभेतील घटनेनंतर विधानसभेतही प्रत्येक आमदाराला जास्तीत दोन पासेस देण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती