नवोदित कविंना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गौरवार्थ, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने ‘विशाखा काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सन २०१७ च्या या पुरस्कारासाठी कविंनी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी पुरस्कारांची निवड केली जाईल. रु.२१,०००/-, रु.१५,०००/- व रु. १०,०००/- (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी नवोदित कवी किंवा त्यांच्या प्रकाशकांनी १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती दि. १७ एप्रिल २०१७ पूर्वी डॉ. विजया पाटील, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – ४२२ २२२ या पत्यावर पाठवाव्यात असे आवाहन मुक्त विद्यापीठाने केले आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात येणारा काव्यसंग्रह हा संबंधित कवीचा पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असावा आणि हा आपला पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र काव्यसंग्रहाबरोबर पाठविणे बंधनकारक आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेले काव्यसंग्रह परत पाठविण्यात येणार नाहीत. हस्तलिखित किंवा कात्रणे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२२३०१२७ किंवा ९४२२२४७२९१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा किंवा http://ycmou.digitaluniversity.ac अथवा http://ycmou.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.