"गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राऊत म्हणाले, "गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही, जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले. ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसावं लागेल. हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे 30 वर्षं काम केलं आहे. माझा शब्द कधी खोटा होत नाही."
"संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिनीवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत," असं राऊत म्हणाले.