गुलाबराव पाटील यांनी केलं नितीन गडकरींचं कौतूक

शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (21:34 IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते मुंबई (Mumbai) नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तरसोद चिखली दरम्यान झालेल्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पांचं डिजिटल पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं कौतूक केलं. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा वाद सुरु असताना सेनेच्या नेत्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं केलेलं कौतूक हा चर्चेचा विषय ठरलाय.
 
नितीन गडकरी जेंव्हा विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी मी आमदार होतो. विरोधीपक्ष नेते असतांनाही त्यांच्याकडून खूप शिकलो असं म्हणत गडकरींनी केलेल्या कामामुळे ते चंद्र सुर्य असेपर्यंत गडकरींचं नाव कुणी पुसू शकणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं, ते समृध्दीच्या रूपाने नितीन गडकरी यांनी पूर्ण केलं. तसंच औरंगाबाद पुणे भारत माता मार्ग जळगाव पर्यंत वाढवावा, केळीला फळाचा दर्जा राज्याने मजूर केला मात्र केंद्राकडे हा निर्णय प्रलंबित आहे, तो प्रश्न सोडवावा. जळगाव जिल्ह्यात ड्राय पोर्ट उभारण्यासाठी सहकार्य करावं अशा मागण्या गुलाबराव पाटील यांनी केल्या.
 
गुलाबराव पाटील पुढे बोलताना असंही म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा असलो तरी, गेले 25 वर्ष आम्ही सोबत काम केलं. मात्र नितीन गडकरी हे सर्वच पक्षाचे लाडके नेते आहेत. गडकरी साहेब जगात असतील किंवा नसतील मात्र जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत गडकरी यांचे नाव पुसलं जाणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती