गिरीश महाजन माझे मोठे भाऊ, त्यांनी तेव्हा जे केले तेच मी आता करतोय : गुलाबराव पाटील

शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:20 IST)
जळगाव शहर मनपात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यावरून भाजपचे आ.गिरीश महाजन यांना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी चांगलाच टोला लगावला आहे. गिरीश महाजन हे माझे मोठे भाऊ असून आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहोत. तेव्हा त्यांनी जे केले तेच मी करतो आहे. निवडणुकीच्या वेळी गिरीशभाऊंनी फोडलेले तेव्हा भाजपात गेलेले अर्धे आमच्याच पक्षाचे होते, असा टोला ना.पाटील यांनी लगावला आहे.
 
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात विद्यार्थी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले कि, शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे आहे. आपल्या या परिवारात आपण जसे सुख दुःखात काम करतो तसेच आपण पक्षवाढीसाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
२५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना प्राथमिक मंजुरी
ना.गुलाबराव पाटील यांनी, पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास २५० कोटींच्या योजनांना प्राथमिक मान्यता देण्याचे काम आज करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बंधारे बांधले त्यातून पाईपलाईनने पाणी देण्याचे भाग्य मला आज लाभते आहे. पक्ष कोणता यापेक्षा मी पालकमंत्री आहे, जिल्हा माझा आहे. पालकमंत्री म्हणून मी माझे कर्तव्य बजावत पाणी देण्याचे कार्य केले आहे. सर्वाधिक पाणी योजना पूर्ण करण्याचे कार्य मी केले आहे. ज्या-ज्या जिल्ह्यात पालकमंत्री स्वतःच्या जिल्ह्याचा फायदा करतात तसाच फायदा मी करून आणला आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
 
गिरीश महाजनांना उत्तरप्रदेश घटनेचा विसर
पालकमंत्री म्हणाले कि, शेतसाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचे कार्य होत असेल तर ते निश्चित चुकीची आहे. शेतकऱ्यांना बुडविले जाते हे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी देण्याचे कार्य सरकारने केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. हे सरकार शेतकऱ्यांना ८-८ मुलांना चिरडणारे सरकार नाही. मला वाटते गिरीश भाऊ उत्तरप्रदेशचा विसर पडला आहे, असा टोमणा ना.पाटील यांनी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती