दरेकर यांना दोन आठवड्यांचा मोठा दिलासा

मंगळवार, 29 मार्च 2022 (21:34 IST)
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दोन आठवड्यांचा मोठा दिलासा दिला आहे. प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होती. परंतु वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत दरेकरांना अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
 
बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर एमआरए मार्ग पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यामध्ये त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र, दोन आठवड्यानंतर याप्रकरणी कधी सुनावणी पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्यातरी दरेकरांवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई होऊ शकणार नाहीये.  प्रवीण दरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबद पोंडा यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी बाजू प्रदीप घरत यांनी मांडली होती. तसेच दोन दिवसानंतर हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दरेकरांची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती