मुंबई उपनगरातील गोरेगाव तीन तासांत दोन ठिकाणी अग्नितांडव

गुरूवार, 25 जानेवारी 2024 (09:07 IST)
मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका 26 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेकडील एस. वी. रोड परिसरातील अनमोल टॉवर या उंच इमारतीला ही आग लागल्याची माहिती समोर आली. 27 मजली इमारतीमध्ये 25 आणि 26व्या मजल्यावरील पेंट हाऊसमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. अनमोल प्राईड या इमारतीत बुधवारी सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास इमारतीमधील 26व्या मजल्यावरील पेंट हाऊसमध्ये भीषण आग लागली. ही आग काही अवधीतच भडकली. त्यामुळे इमारतीमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून बचाव आणि मदतकार्य हाती घेतले.
 
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीची तीव्रता पाहता सायंकाळी 6.27 वाजताच्या सुमारास आग स्तर – 2 ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 7 फायर इंजिन व 4 जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर रात्री उशिराने नियंत्रण मिळविले व आग पूर्णपणे विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत इमारतीच्या 25 व 26 व्या मजल्यावरील सामान जळाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग का व कशी काय लागली यांबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.
 
तर आग विझल्यानंतर काही वेळातच याच घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या राम मंदिर परिसरात भीषण आग लागली. या आगीमध्ये राम मंदिर परिसरातील मृणाल गोरे पुलाखाली अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. तर केमिकल आणि डिझेलच्या दुकानाला आग लागल्याने ही आग भडकली असल्याचे सांगण्यात आले असून घटनास्थळी 10 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. या आगीमुळे मृणाल गोरे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या आगीमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती