गुगलकडून व्ही. शांताराम यांना मानवंदना

विख्यात दिग्दर्शक डॉ.  'व्ही. शांताराम यांचा ११६ वा जन्मदिन आणि 'राजकमल' या निर्मिती संस्थेच्या पंच्याहत्तरीचे निमित्त साधून गुगल डुडल आणि व्ही. शांताराम  फांउडेनतर्फे एका अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गुगल डुडल या वेबसाईटवर 'A Colossus of Indian Cinema' या लिंकवर व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारलेले व्हर्च्युअल प्रदर्शन चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. 
 
व्ही. शांताराम मोशन पिक्चर  फांउडेशनचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमानाने हे अनोखे प्रदर्शन रसिकांसाठी खुले झाले आहे. शांतारामबापूंच्या चित्रपट कारकिर्दीविषयीचा दीर्घ आढावा घेण्यात आला आहे. शांतारामबापूंच्या जन्मापासून ते त्यांचे चित्रपटसृष्टीमधील पदार्पण, 'प्रभात'मध्ये त्यांच्या प्रतिभेला फुटलेले धुमारे. तसेच त्यानंतर 'राजकमल'ची स्थापना करून निर्मिलेल्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांबाबत या प्रदर्शनात माहिती देण्यात आली आहे. 
 
'गुगल डुडल' या वेबसाईटवर कला आणि संस्कृती नावाचा एक विशेष विभाग आहे. या विभागात शांतारामबापूंना मिळालेले सर्व पुरस्कार, स्टुडिओतील चित्रीकरणाच्या जागा, ध्वनिमुद्रण स्टुडिओयांची दृश्यफीतही चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच शांतारामबापूंनी दिग्दर्शित केलेल्या  सर्व चित्रपटांची वेगवेगळ्या आकारामधली दुर्मिळ पोस्टर्स आणि छायाचित्रेही या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत. चित्रपट अभ्यासक तसेच माहितीपट निर्माते-दिग्दर्शक श्री. संजीत नार्वेकर यांनी या प्रदर्शनाचे लेखन आणि मांडणी केली आहे. सोबतच सर्च इंजिन गुगलने यानिमित्त खास डूडल तयार केलं असून व्ही शांताराम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती