आम्हाला विकास पाहिजे आहे. मात्र विनाशकारी प्रकल्प गुजरातला पाठवा व लोकांच्या हितीचे प्रकल्प महाराष्ट्राला द्या अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली. मी प्रकल्पासाठी पत्र लिहले जरूर मात्र नंतर काही सुपारी बहाद्दर मला राजापुरात भेटले, काही लोक मला येवून भेटले आणि हा प्रकल्प कसा विनाशकारी आहे पटवून सांगितलं. माझा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र पर्यावरणाचे नुकसान होणारे प्रकल्प आम्हाला नको आहेत. तुम्हाला प्रकल्प द्यायचे असतील तर लोकांच्या हिताचे द्या अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारला केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले? गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचं?रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा,असे ही उध्दव ठाकरे म्हणाले.
प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य हा परिसर आहे.त्या परिसराचा,निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे.या प्रकल्पामुळे काय फायदा होणार हे सुपारी बहाद्दरांनी सांगावी आम्ही विरोध नाही करणार अस आव्हानही ठाकरेंनी दिलं.