शिवसेना म्हणजे महिलांना आदर देणारा पक्ष असे बाळासाहेब ठाकरे यांनी ओळख करवून दिली आणि ती शिवसैनिकांनी टिकवली सुद्धा, मात्र जेव्हा स्वतः शिवसैनिक असे असभ्य वर्तन करतो तेव्हा काय होते याची प्रचीती पिंपरी-चिंचवडमध्ये आली आहे.
शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाने महिला पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली असून, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष बाजीराव लांडे याच्या विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर शिवसेनेच्या पीडित महिला पदाधिकाऱ्यांने फिर्याद दिली आहे. त्यानुसार निगडी पोलिसांनी आरोपी बाजीराव लांडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान सय्यद यांच्या जनसंपर्क कार्यलायत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. सर्व कार्यकर्ते आपापली मत मांडत होती. त्याचवेळी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष लांडे आले, माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी हा मतदारसंघ भाजपा पक्षाला दिला आहे. शिवसेना पक्षाचे त्यांनी वाटोळे केले आहे असं म्हणत माजी खासदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तेव्हा, फिर्यादी शिवसेना महिला पदाधिकारी आरोपीला म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करू नका. तुम्ही तुमचे विचार मांडा असे म्हणताच आरोपी लांडे यांनी संबंधित महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केली. सोबत असलेल्या महिलांना धक्काबुक्की करत फिर्यादी महिला शिवसेना पदाधिकाऱ्याला दोन कानशिलात लागवल्या होत्या, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर उपस्थित महिलांनी मग सर्वांनी मिळून लांडे याला चांगलाच चोप दिला व पोलिसात दिले.