अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय - नवाब मलिक

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:47 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत सीवीसीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत  देखील उपस्थित होते.
 
हा सर्व भ्रष्टाचार मुख्यमंत्री यांच्या आशिर्वादाने झाल्याचा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
 
मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट - २ येतोय असं सांगितलं होते त्याची आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो असे सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तर दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही. याउलट पवारसाहेब यांच्यावर ईडीचा गुन्हा दाखल केल्याचा विषय पुढे सोडला आणि शिवस्मारक घोटाळा बाजूला गेला, असेही नवाब मलिक म्हणाले.
 
हे घोटाळेबाज सरकार असून स्मारकातही घोटाळे करत आहेत. ३ हजार ८२६ कोटीचे टेंडर असताना लोयेस्ट टेंडर काढण्यात आले. ही किंमत २६९२ कोटी करण्यात आली. एल अॅ.ण्ड टी २५०० कोटीत कमी करतो असे सांगितले. ४२ टक्क्याने टेंडर भरतो असे दाखवायचे आणि १२०० कोटीने कमी करण्यात आले असे दाखवण्यात आले. हा पद्धशीर डिझाईन करुन भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
 
मुकुल रोहतगी यांची व व्ही. एन. खरे नामवंत वकील यांची कंपनी आहे. यांच्याकडून लॉ अॅण्ड ज्युडीसियलला बायपास करण्यात आले आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात लॉ अॅण्ड ज्युडीसियल कशासाठी ठेवले आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला. दोन लिगल ओपिनियनमध्ये शब्द ना शब्द एकच आहे. म्हणजे सुरुवातीपासून ठरवून एल अॅेण्ड टी ला टेंडर द्यायचे ठरले होते असा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती