हमारा नेता क्लिन बोल्ड करनेवाला नेता है - नवाब मलिक

बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:49 IST)
मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. याला येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्युत्तर देण्याचे काम महाआघाडीने हाती घेतले आहे. महाआघाडीच्या प्रचार मोहिमेचे ब्रीदवाक्य लाज कशी वाटत नाही असे असेल, अशी माहिती मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. मुंबई येथे घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा जाहिरनामा प्रसारित करण्यात आलाय. आम्ही देशाच्या जनतेप्रती वचनबद्ध आहोत. दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यांमध्ये गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. देशाच्या पंतप्रधानांनी काल वर्धा येथून राज्यातील प्रचाराला सुरुवात केली. मात्र, गारपिटीचा पाऊस पडला त्याठिकाणी सरकारी कर्मचारी फिरकले देखील नाहीत, ही शेतकऱ्यांची चेष्टाच सरकारने केली आहे, असे मलिक म्हणाले. वर्षापूर्वी मोदींनी शेती आणि शेतकऱ्यांबाबत तासनतास भाषणे केली. मात्र आता हेच पंतप्रधान शेतकऱ्यांबाबत २ मिनिटांवर बोलत नाहीत. या भाजपाने दुष्काळी परिस्थिती काय सुधारली याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही मलिक यांनी सरकारला दिले.
 
आजकाल पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून टीका करत आहेत. हमारा नेता बोल्ड होनेवाला नही क्लिनबोल्ड करनेवाला नेता है, असे प्रत्युत्तर मलिक यांनी दिले. पुढे भाजपाला धारेवर धरताना मलिक म्हणाले की, भाजपा २०० जागा जिंकू शकत नाही याच गोष्टीने मोदींनी पवार साहेबांना उद्देशून बोल चढवले आहेत. २०११ साली याच गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी पवार साहेबांचे कौतुक केले होते. आमचा नेता हा शेतकऱ्यांचा नेता आहे, मात्र भाजप पक्ष शेतकऱ्यांची लूट करणारा पक्ष आहे, अशा टीका नवाब मलिक यांनी केली. भाजपाला आपल्या परिस्थितीचा अंदाज आला आहे, गडचिरोली, नागपूर,धुळे यात भाजपा जिंकू शकत नाही, हे चित्र त्यांनी ओळखले आहे, अशी टीकाही मलिक यांनी केली.
 
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्लास्टो, काँग्रेस पक्षाचे माजी खासदार हुसेन दलवाई, अल नसद झकारिया, सोशल मिडीया प्रभारी अभिजित सकपाळ यांसोबत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती