फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल

बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:33 IST)
ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केला.
 
कोविडमुळे मागील दीड वर्षांपासून अनेक उद्योगांचे विस्तार रखडलेले असताना फ्लिपकार्ट कंपनीने या संकटावर मात करत आपल्या प्रकल्पाचा विस्तार केला. ही बाब राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. राज्याला उद्योगक्षेत्रात पुढे नेण्यासाठी फ्लिपकार्टने उचलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. याद्वारे गुंतवणुकीचा ओघ वाढेल, शिवाय बेरोजगार तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे  देसाई म्हणाले.
 
भिवंडी व नागपूर येथे प्रकल्प विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांची मागणी वाढू लागल्याने व वेळेत वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्पविस्तार करण्यात आला आहे.भिवंडी येथे सुमारे सात लाख चौरस फूट जागेवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.याद्वारे चार हजार जणांना रोजगारांची संधी मिळणार आहे.दुसरा प्रकल्प नागपूर येथे होणार आहे. राज्यातील स्थानिक व्यापारी, विक्रेते व लघु,मध्यम उद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तुंना यामुळे बाजारपेठ उपलब्ध होईल,असा विश्वास फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती