First ST Conductor Laxman Kevate Death महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. बुधवारी रात्री साडे नऊच्या वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन लक्ष्मण केवटे यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच एसटी महामंडळाकडून देखील आदरांजली वाहण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.