राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुमारे 13 दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलंय.
गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाबाबत घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वारंवार बैठका सुरू होत्या. अखेर आज खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग देण्यात आले आहेत.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.