एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात फडणवीसांची अचानक एन्ट्री झाली आणि...

मंगळवार, 11 एप्रिल 2023 (08:44 IST)
facebook
8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा ठरला होता. एकनाथ शिंदे यांचे लखनऊला विमानतळावर पोहचल्यापासून ते 136 किलोमीटर अंतरापर्यंत हजारो बॅनर्स लागले होते.
 
अयोध्यानगरीत असलेले जवळपास सर्व हॉटेल्स बुक होते. सगळीकडे एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती.
 
दोन ट्रेनमधून कार्यकर्ते अयोध्येत दाखल होत होते. मुंबई आणि उत्तरप्रदेशच्या प्रसार माध्यमांच्या टीम्सही मोठ्या प्रमाणावर अयोध्येत दाखल झाल्या होत्या. प्रत्येक ठिकाणच्या कव्हरेजची तयारी होत होती.
 
मंत्री उदय सामंत आणि युवासेनेचे कार्यकर्ते नियोजनाचा आढावा घेत होते.
 
दोन दिवसआधी भाजपचे मंत्रीही या दौऱ्यात सामिल होणार हे जाहीर करण्यात आलं. दौऱ्याच्या आदल्या दिवशी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण हे चार मंत्री सामिल होणार असं उदय सामंत यांनी जाहीर केलं. पण त्याचदिवशी
 
रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार हे निश्चित झालं. त्यामुळे शिंदेंच्या दौऱ्यात अचानक भाजप नेते येण्याबाबत कुजबूज सुरू झाली.
 
शिंदेच्या दौऱ्यात फडणवीसांची एन्ट्री?
8 एप्रिलला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह लखनऊला पोहचले. दिल्लीला 4 वाजताच्या महत्वाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीसांना पोहचायचं होतं. मग ते कसे येणार? ते लखनऊवरून मुख्यमंत्र्यांबरोबर काही वेळासाठी तरी अयोध्येत येऊन जातील असं सांगितलं गेलं.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस लखनऊला पोहचून मुख्यमंत्र्यांसोबत हेलीकॉप्टरने अयोध्येकडे निघाले. भाजपचे मंत्री माध्यम प्रतिनिधींशी बोलणं टाळत होते.
 
शिवसेनेचे मंत्री शिवसेना भाजप युती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तम पध्दतीने राज्य चालवत आहेत. मग रामाच्या दर्शनासाठी एकत्र आले तर त्यात राजकारण करण्याची गरज नसल्याचं ठामपणे सांगत होते. याबाबत प्रश्न विचारल्यावर, का दर्शनासाठी नाही यायचं? असे उलट प्रश्न माध्यमांना विचारत होते.
 
कोणी म्हणत होतं, एकत्रित अयोध्येला आल्यामुळे एक वेगळीच छाप पडेल आणि युती मजबूत असल्याचं दिसेल.
 
काहीजण शिंदेंचा दौरा भाजपकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न असल्याचं बोलत होते. तर कोणी हिंदूत्व ही भाजपची एकट्याची मक्तेदारी आहे. या दौऱ्यातून होणाऱ्या प्रचाराचं श्रेय एकट्या एकनाथ शिंदेंना मिळू नये अशी भाजपची खेळी असल्याचं बोलत होते.
 
दुसरीकडे हेलीपॅडच्या समोरच्या बाजूला कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे लाईव्हसाठी तयार होते. पदाधिकारी, आमदार, खासदार स्वागतासाठी उभे होते. 11 वाजल्याच्या सुमारास धुरळा उडवत मुख्यमंत्र्यांचं हेलीकॉप्टर अयोध्येत उतरलं. कार्यकर्ते ‘जय श्रीरामच्या’ घोषणा देऊ लागले. गळ्यात भगवा ‘स्कार्फ’ घालून एकनाथ शिंदे बाहेर आले.
 
सोबत देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, रामदास कदम हे नेतेही होते. जंगी स्वागत स्विकारत बाहेर पडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ओपन जीपमध्ये बसले. फुलांचा वर्षाव करत रॅली राम मंदीराच्या दिशेने निघाली. माध्यमांचं लाईव्ह स्ट्रीमिंग, मुलाखत मिळवण्याची धडपड सुरू होती.
 
मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. निवडणूकीच्या प्रचाराच्या रॅलीसारखं चित्र अयोध्येत दिसत होतं. आगामी निवडणूकीच्या प्रचाराचा भास होत होता. सर्व मराठी चॅनेल्सवर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा दौरा दिसत होता.
 
ही रॅली राम मंदिराच्या थोडी आधी थांबली. रामाचं दर्शन, महाआरती आणि मंदीराच्या कामाची पाहणी करून ताफा हनुमान गढीकडे निधाला होता. स्थानिक लोकही एकनाथ शिंदेंना बघण्यासाठी बाहेर थांबले होते.
 
गाड्या बाहेर अडवल्यामुळे नेते सोडून दौऱ्यासाठी आलेले सर्वजण चालत निघाले. ऊन्हाचा पारा प्रचंड चढला होता. अंतरही जास्त होत. कोणी चालत तर कोणी स्थानिक बाईक चालकांना थांबवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत.
 
हनुमान गढीच्या बाहेर स्टेज बांधून ‘नाथांचा नाथ …’ हे गाणं वाजत होतं. काही कार्यकर्ते नाचत होते. तर काही ऊन्हाने थकून गेले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हनुमान गढीला पोहचले. त्यांना एक मोठा धनुष्यबाण देण्यात आला. त्यानंतर स्टेजवर भाषणं झाली. अयोध्येचे खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार स्वागत केलं.
 
फडणवीसांच्या येण्याच्या चर्चेबद्दल त्यांनाच विचारलं तेव्हा फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा दौरा हा नियोजित होता. माझा अचानक ठरला. पण आणि नेते म्हणून नाही तर रामभक्त म्हणून आलो आहोत. यात कोणतही राजकारण नाही. इतरांच्या टीकांची आम्ही पर्वा करत नाही”.
facebook
राष्ट्रीय पातळीवर शिंदेचा प्रचार?
2.30-2.45 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू झाली. या पत्रकार परिषदेची सुरवात मुख्यमंत्र्यांनी हिंदीतून केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हिंदी चॅनेल्सच्या मुलाखतीत हिंदुत्व, राम मंदिराची बांधणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उध्दव ठाकरेंनी सोडलेलं हिंदूत्व या सगळ्यावर भाष्य केलं.
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उत्तरप्रदेशमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा केली होती. त्याला हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची घोषणा केली.
 
पुढे शिंदेंनी साधूसंतांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तिथे पुन्हा एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देऊन आशिर्वाद देण्यात आला. त्या कार्यक्रमातील एक प्रमुख महंत मैथिली चरण यांना एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या राजकारणाविषयी विचारलं, तेव्हा ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते ज्यांच्या नावापुढे 'हिंदूहदयसम्राट' लागलं. उद्धव ठाकरे हे कॉंग्रेसबरोबर गेले आणि हिंदू धर्माच्या मुद्यापासून दूर झाले. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंचं आहे. त्यांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यांची अशीच प्रगती व्हावी यासाठी आम्ही त्यांना आशिर्वाद दिला.”
 
अयोध्येतील तीन महंतांनी बोलताना हेच शब्द वापरले. एकनाथ शिंदे चांगलं काम करतात, हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं हे चांगलं केलं असे बोलणारे असंख्य लोक शरयू नदीच्या घाटावर भेटत होते. हे उत्तरप्रदेशातील कार्यकर्ते आहेत की सामन्य लोक असा प्रश्न पडत होता. पण एकनाथ शिंदेंच्या विरोधात फार कोणी बोलणार दिसत नव्हतं. कदाचित हाच राष्ट्रीय पातळीवर हिंदूत्वाचा प्रचार असावा.
 
शरयू आरती करून मुख्यमंत्री उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी निघाले. योगी आदित्यनाथ यांच्याशी तासभर चर्चा करून मुंबईकडे रवाना झाले. अयोध्येच्या या ‘ग्रॅंड’ दौऱ्याची अयोध्या ते लखनऊपर्यंत चर्चा होती. पण याचे परिणाम महाराष्ट्रात काय होईल हे आगामी काळात कळेल.
Published By -Smita Joshi 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती