मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.शिंदे यांच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबई विमानतळावरुन लखनौकडे उड्डाण केलं. रात्री लखनौमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी (9 एप्रिल) दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी एक दिवस आधीच शिवसैनिक अयोध्येला पोहचले आहेत.
एकनाथ शिंदे गटातील अनेक नेते शिंदे यांच्या सोबत रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी विमानात घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देत आहे. एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरीत घालवणार आहेत. यावेळी ते मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत.