विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसाठी आत्तापासून सुरुवात करावी; तंत्रशिक्षण विभागाची सूचना

शनिवार, 8 एप्रिल 2023 (21:14 IST)
पुणे :प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रावर केली जाते. ऐनवेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे मिळविण्यासाठी आतापासूनच सुरुवात करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
 
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम, बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका व पदवी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी-तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवी, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविली जाते. बारावीच्या निकालानंतर या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनलयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या.
 
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सैन्य दलातील अथवा अल्पसंख्याक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चित केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती