मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहील्यांदाच एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.
शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार आणि जवळपास 3 हजार कार्यकर्त्यांसह ते अयोध्या दौरा करत आहेत. या दौऱ्यात भाजपचे चार मंत्रीही सहभागी होत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळालं. त्यासाठी ही 'धनुष्यबाण यात्रा' आहे. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत महंतांकडून एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण दिला जाईल.
तो धनुष्यबाण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर नेला जाणार आहे. राजकीयदृष्ट्या धनुष्यबाण या चिन्हाचा राज्यभर प्रचार केला जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अनेक आमदारांना अयोध्या दौरा अचानक रद्द करण्यास सांगितले होते.
त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी होती. त्यानंतर काही महिन्याच शिंदे यांनी बंड केलं आणि नवीन सरकार स्थापन केलं. त्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार हे शिंदे यांनी जाहीर केलं होतं.
याव्यतिरिक्त हा दौरा कसेल? आणि यातून काय साध्य होणार ? याबाबतचा हा आढावा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यासाठी जोरदार तयारी अयोध्येत करण्यात आली आहे. 1500-2000 बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत.
ठाणे आणि नाशिकमधून निघालेल्या ट्रेननधून असंख्य शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यातून एक मोठं शक्तीप्रदर्शन एकनाथ शिंदे यांच्याकडून केलं जात आहे.
अयोध्या दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 एप्रिलला रात्री लखनौला पोहचले आहेत.
9 एप्रिलला सकाळी 10 वाजता ते अयोध्येकडे रवाना होतील.
11 वाजता हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहचतील.
12 वाजता राम मंदीराच्या ठिकाणी महाआरती करतील. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू असलेल्या ठिकाणाची पाहणी करतील.
दुपारी 2.30 च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन पुढे महंतांच्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण किल्यावर दाखल होतील. तिकडच्या महंताकडून धनुष्यबाण स्विकृतीचा कार्यक्रम होईल.
संध्याकाळी 6 वाजता शरयु नदीची आरती केली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे लखनऊकडे रवाना होतील.
रात्री 9 वाजता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे भेटीसाठी पोहचतील.
साधारण रात्री 10 वाजता शिंदे मुंबईकडे रवाना होतील.
दौऱ्यामागे हिंदुत्वाचं राजकारण?
कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हे बंडाचं प्रमुख कारण असल्याचं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून सांगितलं जात आहे.
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले ते आम्ही पुढे नेत आहोत, असं एकनाथ शिंदे अनेकदा म्हणाले आहेत.
अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर हिंदूत्ववादी नेते असा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
याविषयी आम्ही एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणारे महंत मैथीली चरण यांच्याशी चर्चा केली.
महंत मैथिली चरण हे लक्ष्मण गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण देऊन आशीर्वाद देणार आहे.
ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणतात, “बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते ज्यांच्या नावापुढे 'हिंदूहदयसम्राट' लागलं. उद्धव ठाकरे हे कॉंग्रेसबरोबर गेले आणि धर्माच्या मुद्यापासून दूर झाले. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंचं आहे. त्यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण देऊन आशीर्वाद देणार आहोत”.
ठाकरे गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार हा गद्दार, खोके सरकार म्हणून केला जात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष ताब्यात घेतला. सरकारमध्ये महत्त्वाची पदं देऊनही फसवणूक केली असं उद्धव ठाकरेंकडून सतत बोललं जात आहे.
अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “काय कलियुग आले आहे, रावणराज्य चालवणारे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. पण राज्यात आम्ही लवकरच रामराज्य आणू.”
ठाकरेंच्या सतत गद्दारीच्या आरोपांमुळे आगामी निवडणूकीत शिंदेंच्या विरूद्ध भावनिक वातावरण तयार होऊ शकतं.
लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची प्रतिमा गद्दार, खोके या टिकेमुळे मलिन करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा आहे. पण अयोध्या दौरा, सावरकर यात्रा असे मुद्दे घेऊन टीकांना हिंदुत्वाचा वैचारिक मुलामा देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून केला जात आहे. शिंदेंच्या या दौऱ्यातून हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यातून जर हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला तर इतर भावनिक मुद्दे हे मागे पडतील आणि आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला फायदा होईल.
"पण जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिमा गद्दार, खोके, बाळासाहेबांची शिवसेना फोडली या मुद्यांवर नकारात्मक तयार झाली तर मात्र एकनाथ शिंदे यांना भविष्यात निवडणुका कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या प्रयत्नात कोण सरस ठरतय यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील,“ प्रधान सांगतात.
भाजप मंत्रीही होणार सहभागी
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे आणि रविंद्र चव्हाण हे चार मंत्री अयोध्या दौऱ्यात सामिल होणार आहेत. ते एकनाथ शिंदेंवर नजर ठेवणार की त्यांना बळ देणार अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.
याबाबत मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आम्ही तिथे रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहोत. मुख्यमंत्री आमच्या भाजपच्या राज्यात येत आहेत त्यांचं स्वागत आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही दोन पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जात आहोत. त्यात राजकारण करण्याची काही गरज नाही”
याआधी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले होते. तेव्हाही मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे मोहीत कंबोज त्या दौऱ्यात सामिल झाले होते.