वसुलीचा तर फडणविसांना दांडगा अनुभव ! : नाना पटोले

गुरूवार, 25 मार्च 2021 (07:45 IST)
अहमदनगर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे हे उद्योग सुरु आहेत. फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळात सुद्धा खोटे बोलतात. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना आहे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.
 
प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस बदल्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी  केलेल्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, फडणवीस त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात होता, याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत. फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे.
 
भाजपाने आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. या अधिकाऱ्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपा करत आहे परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे.
 
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपावाले टीका करत होते, आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत याची आम्हाला माहिती आहे. मुळ मुद्दा हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जीलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीचा होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती