नाना पटोले : RSS ला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात किती टक्केवारी दिली?

बुधवार, 24 मार्च 2021 (17:39 IST)
केंद्राकडून IPS अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांचा वापर केला जात आहे. या माध्यमातून राज्य सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर अशाच प्रकारचे आरोप झाले होते. पण देवेंद्र फडणवीस तेव्हा न्यायाधीशाच्या भूमिकेत गेले होते. त्यांनी सर्वांना क्लिनचीट दिली होती, असं पटोले म्हणाले.
"RSSच्या लोकांना फडणवीस यांच्या कार्यकाळात मंत्रालयात अनेक महत्त्वाची पदं दिली होती. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, त्यांना किती टक्केवारी दिली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत," असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
परमबीर सिंह - अनिल देशमुख प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी बुधवारी (24 मार्च) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
 
RSS ला किती टक्केवारी दिली?
कोरोना, लसीकरण या मूळ प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. RSS चे लोक फडणवीस यांच्या मंत्रालयात लावण्यात आले होते, त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला. त्यांना किती टक्केवारी दिली याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या लोकांकडून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसने देशाला विकलं नाही, तर उभं केलं. खोटे आरोप करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.
नाना पटोले पुढे म्हणाले, "अधिकाऱ्यांनी कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. केंद्राकडून दबाव आणून IPS, IAS अधिकाऱ्यांचा वापर होत आहे. अंबानींनी या प्रकरणात तक्रारही दाखल केली नाही. राज्यात राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. गेल्या काही काळात कार्यालय भाजप कार्यालय बनलंय. 100 कोटी वसुली प्रकरणात न्यायमूर्तींची समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. दोषी असतील तर कारवाई व्हावी, ही काँग्रेसची भूमिका आहे."
फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर आरोप होताना तेच न्यायाधीश व्हायचे. पण आपल्या मंत्र्यांना क्लिनचीट द्यायचं काम फडणवीसांनीच केलं. ते उद्धव ठाकरे यांना बोला म्हणून सांगतात. पण उद्धव ठाकरे संयमी मुख्यमंत्री आहेत. त्यांना कधी काय बोलावं हे चांगलंच माहीत आहे, असा टोला पटोले यांनी लगावला.
तसंच, परमबीर सिंह आधी भाजपसाठी वाईट होते, आता कसे चांगले झाले? मी सरकारमध्ये राहिलो असतो, तर परमबीर सिंह यांची बदली नव्हे तर निलंबन केलं असतं. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती, असंही पटोले यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती