पॅन कार्ड आधारला कसं आणि का जोडायचं?

मंगळवार, 23 मार्च 2021 (20:44 IST)
ऋजुता लुकतुके
तुमचं पॅन कार्ड, आधारशी जोडण्याची मुदत येत्या 31 मार्चला संपते आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड स्थगितही होऊ शकतं. ते टाळण्यासाठी जाणून घ्या पॅन कार्ड आधारला कसं जोडायचं आणि का?
तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्र सरकारने अनिवार्य केलंय.
त्यासाठी शेवटची मुदत आहे 31 मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इन अॅक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं.
तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?
पॅन आणि आधार म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया… पॅन म्हणजे पर्मनंट अकाऊंट नंबर.
आकडे आणि अक्षरं यांचं मिश्रण असलेला हा दहा डिजिट नंबर आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन अनिवार्य आहे आणि आयकर विभागच तुम्हाला पॅन नंबर आणि लॅमिनेटेड ओळखपत्र देत असतं.
बँकेत खातं उघडताना आणि जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांच्या वेळी पॅन क्रमांक लागतो. आणि त्याच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो.
मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला याचा उपयोग होतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रसरकारची एक संस्था आहे. आणि ते आधार ओळखपत्र तुम्हाला देतात. हा एक बारा आकडी क्रमांक आहे जो प्रत्येक नागरिकासाठी वेगळा आहे.
तुमचं नाव, जन्मदिवस, वय, लिंग, निवासाचा पत्ता आणि बरोबरीने तुमच्या बोटाचे ठसे आणि डोळ्यांचं बायोमेट्रिक स्कॅन घेऊन तुम्हाला आधार क्रमांक दिला जातो.
प्रत्येक नागरिकाकडे एक युनिक असं एकच ओळखपत्र असावं आणि हळुहळू रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि शक्य झालं तर वाहन चालवण्याचा परवानाही आधारशी जोडून वेगवेगळी ओळखपत्र बाळगण्याच्या झंझटीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी केंद्राचा हा प्रयत्न आहे.
विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे. तर अशी ही दोन अतिशय महत्त्वाची सरकारी ओळखपत्र आहेत. आणि आता 31 मार्च पर्यंत आपल्याला ती ऑनलाईन जोडायची आहेत. हे कसं करायचं ते बघूया…
 
पॅनकार्ड आधारशी कसं जोडाल?
पॅन आधारला जोडणं एकदम सोपं आहे आणि यासाठी तीन मार्ग आहेत.
पहिला म्हणजे तुम्ही incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तुम्ही ऑनलाईन आर्थिक विवरणपत्र भरत असाल तर तुमचं लॉगिन तयार असेलच. नाहीतर तुम्हाल रजिस्टर करावं लागेल.
त्यानंतर डाव्या बाजूला लिंक आधार अशी एक लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केलंत की तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मग आधार क्रमांक आणि तुमचं नाव लिहावं लागेल. यानंतर लिंक आधार या चौकटीवर क्लिक केलंत की, तुमचा संदेश आयकर विभागाला पोहोचेल. पॅन आणि आधार.
मधली तुमची माहिती जुळते की नाही हे पाहून ते ऑनलाईन जोडणी पूर्ण झाल्याचं तुम्हाला कळवतील. दुसरा एक पर्याय तुमच्याकडे आहे तो एसएमएसचा…
आधार नोंदणी करताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला असेल त्याच मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला UIDPAN ही अक्षरं एसएमएसवर पाठवायची आहेत 567678 किंवा 56161 या क्रमांकावर...पॅन - आधार जोडणीचं पुढचं काम UIADA ही संस्था करेल.
तिसरा मार्ग म्हणजे व्यक्तिश: पॅनकार्ड सेवाकेंद्रात जाणं आणि तिथे एक फॉर्म भरून पॅन आधारशी जोडण्याची विनंती करणं. यासाठी तुम्हाला सोबत आधार आणि पॅन कार्डची एक प्रत न्यावी लागेल. आणि ही सेवा ऑनलाईन किंवा एसएमएस नोंदणीसारखी नि:शुल्क नाही. तर तुम्हाला काही पैसे भरावे लागतील.
ऑनलाईन ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जेमतेम एक दिवस लागतो. पण, त्यासाठी तुमचं पॅन कार्ड आणि आधारमधली माहिती जुळायला हवी.
 
पॅन कार्ड आधारशी का जोडायचं?
ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड नाही जोडलंत आधारशी तर काय होईल? तुमचं पॅन कार्ड रद्द होईल. आणि एकतर आयकर कायदा 272B नुसार तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड नसताना तुम्ही जवळ जवळ कुठलेच मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. 50 हजारांच्या पुढच्या रोख व्यवहारांसाठीही हल्ली पॅन अनिवार्य आहे.
मध्यंतरी आधार कार्डावरची तुमची माहिती गुप्त राखली जात नाही यावरून भरपूर वाद निर्माण झाले होते. त्या काळात म्हणजे दोन वर्षांपूर्वी केंद्रसरकारने पॅन आधारशी जोडण्याची प्रक्रियाही काही काळासाठी संथ केली.
म्हणजे नागरिकांना त्यासाठी दिलेली मुदत वाढवून देण्यात आली. आणि नंतर कोव्हिडच्या उद्रेकामुळेही ही मुदत वर्षभर पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा मुदत वाढली नाही तर 31 मार्चच्या आत आपल्याला हे काम करायचं आहे.
पॅनकार्ड आधारशी जोडणं आपल्याला किती फायद्याचं आहे आणि ते सुरक्षित आहे ना, हे जाणून घेऊया अर्थविषयक सल्लागार चंद्रशेखर ठाकूर यांच्याकडून.
"पॅन कार्ड आधारशी जोडणं सुरक्षित आहे का, आपल्या हिताचं आहे का, याविषयी सुरुवातीला अनेकांच्या मनात शंका होत्या. पण, हळुहळू लोक ही जोडणी स्वेच्छेनं करायला लागले आहेत. पॅन कार्ड जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा काही जणांकडे चुकीने किंवा काही वेळा पहिलं हरवल्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड होती.
"त्यातली बरीच आता रद्द झाली आहेत. पण, तरीही धोका उरतो. पण, आधार कार्डाच्या बाबतीत पुढे असं झालेलं नाही. ते एकाच व्यक्तीला मिळणारं युनिक एकमेवाद्वितीय ओळखपत्र आहे. कारण, त्यात तुमच्या बोटांचे ठसेही आहेत," ठाकूर सांगतात.
"आता पॅन कार्ड आधारशी जोडलं गेल्यावर एकच पॅन कार्ड जोडता येईल. त्यामुळे इतर पॅन रद्द होतील. आणि पुढे बँकेचा किंवा इतर ऑनलाईन व्यवहार आपण करू तेव्हा तो आपणच केला आहे, इतर कुणी तो करूही शकणार नाही. ही सुरक्षितता आपल्याला असेल. ही जोडणी आपल्या हिताचीच आहे," असं ठाकूर सांगतात.
तेव्हा आपल्याकडे अजून सात दिवस आहेत. आणि आधी केलं नसेल तर तोपर्यंत तुमचं पॅन कार्ड आधारशी जोडायला विसरू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती