कोरोना नवा व्हॅरियंट: देशातल्या 18 राज्यांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'डबल म्युटंट' व्हॅरियंट

बुधवार, 24 मार्च 2021 (17:36 IST)
भारतात कोरोना विषाणूमध्ये बदल होत असून, या विषाणूचा एक नवा प्रकार आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं आहे.
या नव्या प्रकारात 'डबल म्युटंट' म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झालेलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या माहितीत्रकात म्हटलं आहे.
मात्र विषाणूचा हा नवा प्रकार नेमका किती धोकादायक आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच खूपच कमी नमुन्यांमध्ये तो आढळून आल्यामुळे, काही राज्यांतील वाढत्या रुग्णसंख्येशी त्याचा संबंध आत्ताच जोडता येणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
तसंच महाराष्ट्रातही कोव्हिडच्या दोन म्युटेशन्सचं अस्तित्व आढळून आल्याची माहिती या पत्रकात दिली आहे.
त्यानुसार देशभरातून एकूण 10787 नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यात देशातील अठरा राज्यांमध्ये 771 नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे घातक ठरू शकतील असे नवे प्रकार आढळून आले आहेत.
यातल्या 736 नमुन्यांमध्ये युकेमधील, 34 नमुन्यांत दक्षिण आफ्रिकेतील तर एका नमुन्यात ब्राझिलमधील कोरोना विषाणूचा प्रकार आढळून आला आहे.
 
म्युटेशन आणि जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय?
म्युटेशन म्हणजे विषाणूच्या रचनेत थोडासा बदल होणं. लाखो लोकांच्या शरीरातून उड्या मारत विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात.
अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा व्हेरियंट्स म्हणतात.
SARS-CoV-2 या सध्या कोव्हिडला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे अनेक स्ट्रेन्स आणि व्हेरियंट्स जगभरातल्या जवळपास सर्वच देशांमध्ये आढळून आले आहेत.
एरवी विषाणूंमध्ये म्युटेशन अनेकदा होतच असतात आणि ती सगळीच धोकादायक नसतात. पण काही म्युटेशन्स अधिक धोकादायक किंवा अधिक वेगानं पसरणारी असतात.
म्हणूनच त्यांवर लक्ष ठेवणं साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचं असतं. विषाणूचे असे नवे प्रकार ओळखण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, तिला जिनोम सिक्वेन्सिंग असं म्हणतात.
यात विषाणूच्या गुणसुत्रांचा सगळा नकाशाच मांडला जातो आणि त्यात झालेले बदल लक्षात घेतले जातात.
भारतात असं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचं काम INSACOG म्हणजे द इंडियन SARS-CoV-2 कॉन्झॉर्टियम ऑन जिनॉमिक्स हा दहा प्रयोगशाळांचा गट करतो आहे.
ते फक्त विषाणूंच्या बदलांचा शोध घेत नाहीत, तर त्या बदलांचा आजाराच्या साथीवर कसा परिणाम होतो आहे, याचाही तपास करतात.
 
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांत वाढ
महाराष्ट्रात डिसेंबरच्या तुलनेत आता कोरोना विषाणूच्या काही नमुन्यांमध्ये E484Q आणि L452R या म्युटेशन्सची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
"ही म्युटेशन्स जास्त वेगानं पसरणारी आणि सध्याच्या रोगप्रतिकारक्षमतेला चकवा देऊ शकणारी आहेत. 15-20% नमुन्यांत ही म्युटेशन्स दिसून आली. पण ती याआधीच्या कुठल्याही चिंताजनक विषाणूंशी मिळतीजुळती नाहीत." असं आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.
पण राज्यात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढण्यामागे ही म्युटेशन्स आहेत का याविषयी सांगण्यास नकार दिला आहे. त्यासाठी आणखी नमुने तपासून पाहावे लागतील, असं जाणकार सांगतात.
 
भारतात आणखी जिनोम सिक्वेन्सिंगची गरज
गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ सरकारकडे या व्हेरियंट्सवर आणखी संशोधन करायला हवं, तसंच आणखी नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं जावं, अशी मागणी करत आहेत.
"आपण सतत लक्ष ठेवायला हवं आणि असे घातक व्हेरियंट्स लोकांमध्ये पसरत नाहीत ना, याची काळजी घ्यायला हवी. आत्ता ते पसरत नाहीयेत, म्हणजे भविष्यात तसं होणार नाही, असं नाही. जितक्या लवकर त्याविषयीचे पुरावे सापडतील तेवढं उत्त्म" असं विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसीच्या सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना सांगितलं होतं.
गेल्या वर्षी भारतात कोरोना विषाणूचा पहिले रुग्ण नोंदवले गेल्यानंतर काही दिवसांतच त्या रुग्णाच्या नमुन्यांतील विषाणूचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं.
त्यानंतर देशात आजवर 1 कोटी 17 लाख लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आणि 1 लाख 60 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पण म्युटेशन्सचा शोध लावण्याचं काम सुरूच आहे.
गेल्या महिन्यापासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणखी आहानं निर्माण करणारी ठरू शकते, कारण देशातली आरोग्य व्यवस्था गेलं वर्षभर कोरोना विषाणूशी लढताना थकून गेली आहे.
अनेक राज्यांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जातायत आणि विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
दिल्ली आणि मुंबईत गर्दीच्या जागी रॅपिड टेस्टिंगचे आदेश देण्यात आले आहेत.
पण वाढत्या रुग्णसंख्येचा म्युटेशन्सशी संबंध नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बुधवारीच देशात 47,262 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 275 जणांचा म-त्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणासोबतच जिनोम सिक्वेन्सिंगही अधिक प्रमाणात केलं जावं, अशी मागणी होते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती