डिजीटल युगात भारत निवडणूक आयोग एक पाऊल पुढे

बुधवार, 6 मार्च 2024 (12:33 IST)
भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता पुर्व तयारी सुरु आहे.
आज एकविसाव्या शतकात डिजीटल क्रांतीमुळे दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असतांना भारत निवडणूक आयोगाने देखील पारंपारिक मतदार नोंदणी पासुन प्रत्यक्ष मतदान ते मतमोजणी या संपुर्ण निवडणुक प्रक्रियेत खुप मोठया प्रमाणात विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया सुलभ पारदर्शक, मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडली जाईल याची जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
 
मतदार नोंदणीकरीता  voters.gov.in   या पोर्टलवरुन घरबसल्या नोंदणी, वगळणी, दुरुस्तीची तसेच मतदार यादीत नाव शोधणे या सुविधा सर्व 18 वर्ष पुर्ण झालेल्या पात्र नागरीकांना आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. Voter Helpline App च्या माध्यमातुन मोबाईल ॲपद्वारे नोंदणी, वगळणी, दुरुस्ती घरबसल्या मोबाईलवरुन शक्य झालेली आहे.
 
तसेच प्रत्यक्ष निवडणुक लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांना प्रचाराकरीता आवश्यक विविध परवानग्या सुविधा या ऑनलाईन प्रणालीमधुन अत्यंत सुलभपणे प्राप्त करुन घेण्याची सोय आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.
 
संपुर्ण निवडणूक प्रक्रिये दरम्यान गैरप्रकार रोखणेकामी महसुल, पोलीस, परिवहन, आयकर, उत्पादन शुल्क हे सर्व विभाग कारवाया करत असतात. या कारवाया ESMS (Election Seizure Management System) च्या माध्यमातुन ऑनलाईन केल्याने रिअल टाईम सर्वांना आकडेवारी उपलब्ध होणार आहे.
 
नागरीक/मतदारांना निवडणूक प्रक्रिये दरम्यान निदर्शनास आलेल्या गैरप्रकारांच्या तक्रारी देणेकामी   C-Vigil App आयोगाने उपलब्ध करुन दिले असुन या मोबाईल ॲपद्वारे प्राप्त तक्रारीवर निवडणुक आयोगाचे मार्गदर्शक सुचनांनुसार भरारी पथकाकडून कारवाया केल्या जाणार आहेत.
 
सक्षम ॲपच्या माध्यमातुन दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची मागणी घरबसल्या नोंदविता येणार असुन प्राप्त विनंतीनुसार संबंधित केंद्रावर दिव्यांग मतदारांकरीता आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्या जाणार आहेत.
 
ETPBS प्रणालीच्या माध्यमातुन सैन्य दलातील मतदारांना ऑनलाईन पध्दतीने पोस्टल बॅलेटची सुविधा आयोगाने उपलब्ध करुन दिलेली आहे. ENCORE प्रणालीच्या माध्यमातुन संपूर्ण मतदान केंद्रनिहाय टक्केवारी ते मतमोजणी पर्यंतची माहिती रिअल टाईम उपलब्ध करणेची सुविधा आयोगाने उपलब्ध केलेली आहे.
 
अशा प्रकारे भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या विविध पोर्टल, ॲपच्या माध्यमातुन तंत्रस्नेही, सुलभ पध्दतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणे शक्य होणार असुन नाशिक जिल्हयात यासर्व ऑनलाईन प्रणालीकरीता नोडल अधिकारी नेमणुक करुन त्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
 
Edited By- Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती