नंदुरबार तालुक्यात ३ हजार २३६ नागरिकांना देणार शबरी योजनेतून घरकुले

बुधवार, 6 मार्च 2024 (09:47 IST)
नंदुरबार तालुक्यात ३ हजार ३३६ पात्र आदिवासी बांधवांना शबरी योजनेतून घरकुले देण्याचा मानस आहे. तसेच कामगार, मजूर बांधवांना आवश्यक असलेली गृहोपयोगी भांडी तसेच मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनही दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
 
नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित शबरी घरकुल योजनेचे आदेश वाटप व कामगार कल्याण मंडळाच्या गृहोपयोगी वस्तुंच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, अर्चना गावित नटावदच्या सरपंच जयश्री गावित नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे आम्ही लोकसेवक आहोत. येथील नागरिकांचे गुजरात राज्यातील स्थलांतर रोखण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या सर्व उपाययोजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यास कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील पेयजल, सिंचनासाठी पाणी, दळणवळण, आरोग्य संस्थांचे निर्माण आणि विस्तारीकरण त्याच बरोबर शेतीपूरक उद्योगासाठी भरीव अशा निधी आणि उपक्रमांची तरतूद करण्यात आली आहे.

जन्मापासून मनुष्याचे संपूर्ण जीवन समृद्ध करणाऱ्या योजना शासनाच्या आहेत. अलिकडे गेल्या १० वर्षात जीवनमान उंचावणाऱ्या योजना तळागाळातल्या माणसांसाठी केंद्र व राज्य शासनाने तयार केल्या आहेत. या सर्व योजना जिल्ह्यात पोहचवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
 
जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान सुधारण्याचे आवाहन यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.
 
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांसाठी वरदान ठरली असून आजतागायत जिल्ह्यात अडिच लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती