तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असं शिंदेंच्या गोटातून सांगण्यात आलं आहे. तर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे चार आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये आले असून ते एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित हे चार आमदार बुधवारी रात्री गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यापैकी जळगावचे चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. आणि ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
तर योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या बंडाला रामदास कदमांची साथ असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता हे शिवसेना आमदार आणि अपक्ष असे एकूण 41 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे.