माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:33 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भुजबळांनी विद्येची देवी सरस्वती मातेविषयी काही विधान केले होते. ज्यावर आता भाजप आणि ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा? ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असं वक्तव्य आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे. अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर भुजबळ बोलत होते.
 
भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाळासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांना शिकवलं नाही. असेलचं शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
 
यावरचं भुजबळ पुढे म्हणाले की, ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगरे नंतर बघूया असं विधान भुजबळांनी केले.
 
राम कदम म्हणाले की,आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकत आहेत. उद्या मंदिरंही खटकतील, मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असं म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस – राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? त्यामुळे राष्ट्रवादीने हिंदू देवी देवतांचा अपमान केला त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागायला हवी असंही राम कदमांनी सांगितले.
 
दरम्यान ब्राह्मण महासंघानेही भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मियांचा अपमान केला आहे. कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही. परंतु जाणूनजुबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा? असे तारे तोडले. हिंदु महासंघ याचा निषेध नोंदवतो. यातून छगन भुजबळ महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण अंमलात आणत आहेत. त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती