आज सुनावणीला सुरुवात झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर आधी निर्णय व्हावा असा मुद्दा लावून धरला. तसेच या आमदारांना विलिनीकरण करावेच लागेल, अन्यथा ते अपात्र ठरतात, हा मुद्दा घटनापीठासमोर अधोरेखित केला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या सुनावणीकडे संपर्ण देशाचं लक्ष आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे.