कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे रात्रीपासून ८ वाजल्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.
तर बळाचा वापर करू
जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका. अति उत्साहीपणा दाखवू नका. आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असं काही चित्रं दिसलं नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा पडू नका, असंही ते म्हणाले.
15 दिवसात आकडे कमी होतील
सध्याची परिस्थिती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळा. पोलीस आपल्यासोबत उभे आहेतच. सरकारच्या आदेशाचं पालन करा. मोठ्या देशांनी लॉकडाऊन केलंय. आपल्याला ते नवं नाही. आपणही नियमांचं काटेकोर पालन केलं तर येत्या 15 दिवसात कोरोनाचे आकडे कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.
आमच्याकडे पॉवर, पण सहकार्य करा
पोलिसांकडे पॉवर आहेत, अॅक्ट आहेत, आम्ही त्याचा कमीत कमी त्याचा वापर करू. मात्र लोकांनी सहकार्य केलं नाही तर कारवाई निश्चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाहीय. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं.