ग्रामीण भाग म्हटला की डॉक्टर नाखूष असल्याचे नेहमीच समोर येते. एका बाजूला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून इतर क्षेत्रात फार मोठा प्रयत्न असतो. मात्र सरकारी डॉक्टर यांची नेमणूक तीही ग्रामीण भागात होणार त्या मुलाखतीस सुद्धा पूर्ण संख्येने उमेदवार येत नाहीत अशी स्थिती आहे. जिल्हातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यात येणार्या अडचणी आहे. हे सर्व पाहता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ३३ जागांसाठी मुलाखती पार पडल्या. मुलाखतीसाठी केवळ १८ डॉक्टर आले होते. त्यातील जवळपास सर्वच डॉक्टर हे ग्रामीण भागात सेवा देण्यास नाखुश होते असे असल्याने मुलाखतीची प्रक्रिया सुरूच राहिल अशी खंत नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केली.
तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी ‘अपुर्या मनुष्यबळा’वर हा सर्व डोलारा उभा आहे. जिल्हा शासकिय रुग्णालय सह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १३४ रिक्त असल्याने हा सर्व ताण जिल्हा रुग्णालयावर पडत आहे. रिक्त पदांमुळे कामावर असणार्या वैद्याकीय अधिकार्यांवर अतिरिक्त ताण येतो, कामात अनेक अडचणी निर्माण होत आहे. कसर भरून काढण्यासाठी शासकीय आदेशानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय या मधील ३३ जागांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. यासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, त्या त्या विषयातील तज्ञ डॉक्टर, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कार्यक्रम व्यवस्थापक यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. बुधवारी झालेल्या मुलाखती मध्ये स्त्रीरोग तज्ञ सात जागांसाठी ११, बालरोग तज्ञ साठी १० पैकी १, भुलतज्ञ साठी १२ पैकी ४, मेंदुविकार तज्ञच्या दोन जागांवर एक, क्ष किरण तज्ञ साठी एका जागेसाठी एक यांच्यासह नेफ्रोलॉजीच्या एका जागेसाठी कोणीही उमदेवार फिरकला नाही. मुलाखतीसाठी उपस्थित असलेले उमेदवार ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नाखुश असल्याचे दिसून आले.