यवतमाळ दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहेमद खान रहेमान खान यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या शेतकरी विधवांना शिलाई मशीनचे वाटप करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे . एवढेच नव्हे तर त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे भारतीय संविधानाच्या प्रती इतर पुस्तके व रोपटे देऊन स्वागत देखील केले .
दिग्रस शहरासह तालुक्यात सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यासाठी परिचित असलेले अंजुमन उर्दू विद्यालयाचे सहायक शिक्षक मजहर अहेमद खान यांची कन्या मुनव्वर ताज हिचा विवाह असेगांव { जि. वाशीम } येथील सरदार खान शाहनूर खान यांच्यासोबत पार पडला . लग्न मंडपात त्यांनी संगीता अशोक तुमाने , माला दिनेश राठोड , अंजुम परवीन शेख अय्युब , सुनीता प्रल्हाद मोहकर व संगीता अरुण लोखंडे या आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करून प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनव पायंडा रचला . एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व पाहुण्यांचे भारतीय संविधान , “शिवरायाचे निष्ठावंत मुस्लीम सैनिक” , स्त्रीभ्रूणहत्या आदी विषयावरील पुस्तके व रोपटे देऊन स्वागत केले .
मोठ्या मुलीच्या लग्नात देखील त्यांनी अपंगांना तीनचाकी साईकलींचे वाटप केले होते . त्यांचा मुलगा हस्सान अहेमद खान याने देखील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त कास्तकांरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान दिली , हे येथे उल्लेखनीय !गरिबांचे फाटलेले संसार शिवण्यासाठी मुलीच्या लग्नात कास्तकार विधवांना शिलाई मशीनचे वाटप .